Ad will apear here
Next
आठवणीतले म्हसोबा देवस्थान (म्हसोबा गेट)


आयुष्यात अशा अनेक जागा असतात, की त्या जागा आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या गोष्टी कधीही विसरल्या जात नाहीत. हमखास लक्षात राहतात. पुण्यात गणेशखिंड रस्त्यावर शेतकी महाविद्यालयाच्या आवारात म्हसोबा देवस्थान आहे, हे अशाच जागांपैकी. स्वारगेट, पूलगेट, फडगेट, मरिआई गेट तसेच म्हसोबा गेट; पण म्हसोबा गेटचे महत्त्व वेगळे आहे. हे प्राचीन देवस्थान आहे. संदर्भ द्यायचा झाला, तर राष्ट्रकूट राजांच्या काळातील पाताळेश्वर मंदिर हे मध्यवर्ती देवस्थान आणि त्या मंदिराच्या सीमारेषेवर असलेले रक्षक म्हणून म्हसोबा, गावठाणातील रोकडोबा, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मरीआई गेट मंदिरातील मांगीरबाबा, गोईंजीबाबा, धावजीबाबा, सेनापती बापट रोडवरील वेताळबाबा ही मंदिरे आहेत. म्हसोबा देवस्थान पूर्वी गणेशखिंड रस्त्यावर होते; पण रस्ता रुंदीकरण करण्यात आले तेव्हा ते मंदिर शेतकी महाविद्यालयात वसवले गेले. 

आजही जुन्या मंदिरांचा परिसर आठवतो. मंदिराच्या आवारात असलेले उसाचे रसवंती गृह. शेतकी महाविद्यालयाच्या शेतात पिकविलेल्या उसाचा रस मधाप्रमाणे गोड, आईची मामी (आजी) तेथे कामाला असली, की रस फुकट मिळायचा, पैसे आजी भरायची. लाल, पिवळी, निळी तिकिटे दोन रुपये हाफ ग्लास, पाच रुपये फुल ग्लास व १० रुपयांना एक लिटर रस मिळत असे. त्याच्या शेजारी चौकीदाराची गोलाकार चौकी व महाविद्यालयाची कमान. 

निवडणुकीच्या काळात शिरनामे सभागृहात मतदान केंद्र असायचे. तेव्हा काँग्रेसकडून बॅरिस्टर गाडगीळ व भाजपकडून अण्णा जोशी यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या दिवशी भोजनव्यवस्था मंदिराच्या आवारात असायची. पुरीभाजी व भेळ... दिवसभर मजा वाटायची. 

अक्षय्य तृतीयेदिवशी देवाचा उत्सव/उरुस म्हणजे काय चंगळच. खेळणी, शेव रेवडी, हार-नारळाची दुकानेच दुकाने. ओढ्याशेजारच्या जागेवर जत्रा भरायची. पलीकडे मधमाशीपालन केंद्राशेजारी भेळपुरीची कायमस्वरूपी गाडी होती. तेव्हा म्हसोबा गेटचा पीएमटी बस स्टॉप त्या जागेवर होता. तेव्हा लाकडी लाल-काळ्या रंगाचे ओंडके, खांब, कट्टा यांनी बस स्टॉप तयार करून बसवत. अनेक प्रवासी बसची वाट पाहत असताना भेळ खाताना दिसत. भेळवाला पांढरेशुभ्र धोतर आणि बंडी, हाफ काळा कोट घालून ओली, सुकी, तिखट झटका भेळ बनवत असे. बुंदीचे लाडू तर लाजवाब. वडारवाडीला, गणेशखिंड रस्त्यावर जाणारे व तिकडून येणारे असंख्य लोक भेळ घेऊन म्हसोबा देवांच्या पाया पडून पुढे निघून जात. 

मंदिरात लाल शेंदूर लावलेली म्हसोबा महाराजांची मूर्ती/तांदळा पाहिला, की सर्व दु:खे विसरून जायला होत असे. दुपारी अनेक प्रवासी, विद्यार्थी, भाजीवाले, भंगारवाले या आवारात सावलीत बसलेले दिसायचे. शिवाजीनगर गावठाणातील पुजारी देवस्थानची देखरेख करतात. शिवाजीनगर, नेताजीवाडी, तानाजीवाडी, चाफेकरनगर, खैरेवाडी, मुळा रोड, वडारवाडी, गावठाण, पोलिस लाइन, तोफखाना इतर परिसरातील सर्व भाविक मंडळी आजही येथे दर्शन घ्यायला येतात. 

पूर्वी म्हसोबा गेट ते चतुःश्रृंगी मंदिर किंवा पुणे विद्यापीठाच्या समोर असलेल्या पाण्याच्या कारंज्यापर्यंत (आता कारंजे नाही) धावणे, सायकल चालवणे अशा शर्यती आम्ही लावत असू. दर रविवारी असंख्य नारळ देवाला अर्पण केले/फोडले जायचे. तेव्हा पाच रुपयांचा एक नारळ फोडलेली अर्धी वाटी फुकट मिळत असे. चौकात असलेल्या मटण मार्केटमध्ये जाण्याआधी खोबरे घ्यायला व दर्शन घ्यायला अनेक जण भेटत. 

शेतकी मैदानावर खेळायला जाताना व येताना पहिला विसावा म्हणजे हे मंदिर. आषाढी वारीच्या वेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालख्या याच चौकातून पुढे जातात. वारकरी संप्रदायात संपूर्ण हिंदू धर्म व महाराष्ट्र भेटतो. आषाढ सुरू झाला, की म्हसोबा मंदिरात भाविकांची गर्दी उसळत असे. मंगळवारी, शुक्रवारी पुरणपोळी, भजी, मेथीची भाजी, आमटी भात, डाळ आणि पापड कुरडया असा नैवेद्य असे. असंख्य लोक जेवतील एवढा नैवेद्य दाखवलेला असायचा. रविवारी तर जत्रा भरलेली असायची. बकरी, कोंबड्या, चिलीम असा बाबांना नैवेद्य. मग काय रस्त्यावरून जाताना मोठ्या पातेल्यात मटण, चिकन मसाला, परतलेला कांदा-लसूण यांचा एकत्रित येणारा वास. भिजलेली माणसे आभाळातून पाऊस पडतोय हे पाहत आपल्या ताटात कधी जेवण पडते अशा विचारात दिसायची. हवशे-नवशे-गवशे सर्व मंडळी सामील असायची. भाकरी भाजताना, भात शिजवताना जोरदार पाऊस-वारा सुटलेला असायचा. स्टोव्ह, चुलीवर स्वयंपाक करताना आयाबायांना कसरत करावी लागत असे. 

मंदिरात प्रचंड मोठी घंटा व अग्निकुंड होते. नारळाच्या साली, उदबत्ती, कापूर, तेल अग्निकुंडात ओतले जाई. देवाकडे प्रार्थना केली जात असे - सर्वांना सुखी ठेवा. पुढच्या वर्षी परत चांगली जत्रा करेन. तुम्हीसुद्धा येथे आला नसाल तर नक्की एकदा आवर्जून भेट द्या व या जत्रेचा हिस्सा व्हा. हा तुमच्याकरिता अविस्मरणीय अनुभव असेल, असे मला वाटते.

- अमित सुरेश साळुंके

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FVRHCT
Similar Posts
शिवाजीनगर बस स्थानक - आठवणींचा वटवृक्ष कोणी तरी म्हटले आहे, की संपूर्ण भारत बघायचा असेल, तर रेल्वेच्या स्टेशनवर बघा. मला वाटतं, सर्व महाराष्ट्र बघायचा असेल, तर एसटी स्थानक बघा. पुण्यातील शिवाजीनगर एसटी बस स्थानक म्हणजे आठवणींचा वटवृक्ष आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरवर्ग, चाकरमानी, वारकरी, यात्रा-जत्रा करणारे, व्यापारी अशा सर्वांचे हे स्थानक
स्वप्नं आणि स्वप्नं स्वप्नं... खूप खूप स्वप्नं.... एकामागून एक काही शुभ्र, काही काळी, तपकिरी.. निळी, हळवीसुद्धा...एकामागून एक येतात... मन डोलत राहतं... स्वप्नं पडत राहतात. त्याच्या पाठीवर पाय ठेवून सत्याचा जन्म होतो. मनाला बरं वाटतं...पायाखाली खरखरीत स्थैर्य येतं....पण
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे
‘आमचा करोनामुक्तीचा अनुभव’ करोनाचे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत आले आहे आणि काही जणांच्या घरात ते येऊनही गेले असेल. तीव्र लक्षणे नसतील, तर होम क्वारंटाइन राहून आणि डॉक्टरी सल्ल्याचे पूर्ण पालन करून या संकटातून सहीसलामत बाहेर पडता येते. घाबरून न जाता केवळ पाळायला हवा तो संयम. ही गोष्ट आहे पुण्यातील अशाच एका दाम्पत्याची, ज्यांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language